औरंगाबाद : मनपा निवडणुकीकरिता प्रशासनाने तयार केलेल्या वॉर्डरचनेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यापाठोपाठ नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे समोर येत आहे. प्रकरणी सध्या आक्षेप स्वीकारले जात आहेत. आज घडीला तब्बल 388 आक्षेप दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
महिनाभरानंतर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीकरिता प्रशासनाने नुकतीच वॉर्ड रचना तयार केली. यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे या वॉर्ड रचनेवर तब्बल 370 आक्षेप दाखल झाले होते. यानंतर 9 मार्च रोजी प्रत्येक वार्ड निहाय एक अशी 115 वॉर्डचि प्रारूप मतदार यादी प्रशासनाने प्रकाशित केली.
यातही मनपा अधिकारी -कर्मचार्यांनी मोठे घोळ केल्याचे समोर येत आहे. यात विद्यमान नगरसेवकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचेही नाव मतदार यादीतून उडविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या या प्रारुप मतदार याद्या वर आक्षेप स्वीकारले जात आहेत. आज घडीला तब्बल 388 आक्षेप दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकार्यांनी दिली. आज रविवार व उद्या सोमवार असे दोन दिवस आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. यामुळे आक्षेपांचा आकडा पाचशे पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आक्षेप दाखल होताच अधिकारी फिल्डवर
9 मार्च पासून या प्रारूप मतदार याद्या वर आक्षेप स्वीकारले जात आहेत. एखाद्या वार्ड संबंधी आक्षेप दाखल होताच दुसर्याच दिवशी अधिकारी-कर्मचारी या आक्षेपांची फिल्डवर जाऊन पडताळणी करीत आहेत.